Chandrapur News: वाहनचालकांनो लक्ष द्या!

Bhairav Diwase
ईद-ए-मिलादनिमित्त चंद्रपूर शहरातील वाहतूक मार्गांत मोठे बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग
चंद्रपूर:- चंद्रपूर शहरात २६ ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलादनिमित्त भव्य जुलूस आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत वाहतूक वळवण्याचे निर्देश जारी केले आहेत.


ईदच्या मिरवणुकीच्या मुख्य मार्गावर सर्वसामान्य वाहनांच्या हालचालींवर निर्बंध घालण्यात आले आहेत.

बंद रस्ते व नो पार्किंग झोन:‌ कोहिनूर ग्राउंड – दस्तगीर चौक – मिलन चौक – गांधी चौक – जयंत टॉकीज चौक – जटपुरा गेट ते प्रियदर्शनी चौक, तसेच प्रियदर्शनी चौक – जटपुरा गेट – कस्तुरबा रोडने कोहिनूर ग्राउंडपर्यंतचा संपूर्ण मार्ग सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहील. हा परिसर तात्पुरता 'नो पार्किंग झोन' म्हणून घोषित करण्यात आला आहे.

 नागपूरकडून शहरात येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग (हलकी वाहने):
घुटकाळा, श्री टॉकीज किंवा पठाणपुरा परिसरात जाण्यासाठी जुना वरोरा नाका चौकातून उजवीकडे वळून रामनगर – संत केवलराम चौक – सेंट मायकल स्कूल – सवारी बंगला चौक – नगीनाबाग ते चोर खिडकी मार्गे शहरात प्रवेश करता येईल.

नागपूर, वणी, घुग्घुस, गडचांदूरकडे जाणारे प्रवासी:
रहमतनगर आणि नगीनाबाग परिसरातून जाण्यासाठी बिनबा गेट, रहेमत नगर, दाताळा मार्गाचा वापर करावा.

बल्लारशा व मूलकडून येणाऱ्या वाहनांसाठी:
शहरात जाण्यासाठी बसस्टँड – एलआयसी ऑफिस – बगड खिडकी मार्ग, जुनोना चौक किंवा प्रसन्ना पेट्रोल पंपावरून बाबुपेठ मार्गे प्रवेश खुला ठेवण्यात आला आहे.

मिरवणूक शांततेत पार पडावी यासाठी नागरिकांनी प्रशासनाने ठरवून दिलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि वाहतूक नियमांचे पालन करून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.