चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्याला एक तरुण, उच्चशिक्षित आणि तडफदार परिविक्षाधीन (Probationary) आयपीएस अधिकारी लाभले आहेत. कुमार सुशांत यांची चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हैदराबाद येथील प्रतिष्ठित सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी (SVPNPA) येथील कठोर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर, हे अधिकारी आगामी ३१ ऑगस्ट २०२६ पासून आपल्या क्षेत्रिय प्रशिक्षणासाठी (Field Training) राजुरा येथे रुजू होत आहेत.
शैक्षणिक पार्श्वभूमी व यशोगाथा:
बिहार राज्यातील मूळ निवासी असलेले कुमार सुशांत यांनी अत्यंत जिद्दीच्या बळावर युपीएससीच्या २०२२ च्या नागरी सेवा परीक्षेत (UPSC CSE 2022) पहिल्याच प्रयत्नात घवघवीत यश संपादन केले. त्यांनी संपूर्ण भारतात १२२ वा क्रमांक (AIR 122) पटकावत भारतीय पोलीस सेवेत (IPS) आपले स्थान निश्चित केले होते. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल देशभरातून त्यांचे कौतुक करण्यात आले होते.
कायद्याची कडक अंमलबजावणी आणि नागरिकांच्या अपेक्षा:
राजुरा उपविभागात कुमार सुशांत यांच्या रूपाने एक ऊर्जावान व अभ्यासू अधिकारी मिळाल्यामुळे परिसरातील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी, तसेच कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी मोठी मदत होईल, अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
