चंद्रपूर:- देशभरात पेपरफुटीच्या घटनांनी शिक्षण आणि भरती प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले असतानाच, आता चंद्रपुरात शिक्षण व्यवस्थेला हादरविणारे एक मोठे रॅकेट उघडकीस आले आहे.
लाखो रुपये मोजल्यास नामांकित विद्यापीठांच्या पदव्या, गुणपत्रिका, डिप्लोमा आणि मायग्रेशन प्रमाणपत्रे तयार करून देणाऱ्या या रॅकेटचा मुख्य सूत्रधार परिमल गौरकर याला नागपुरातून अटक करण्यात आली असून, त्याला मदत करणाऱ्या आणखी एका साथीदाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. याप्रकरणी आतापर्यंत एकूण ३ जण अटकेत आले असून पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू आहे.
चंद्रपुरातील दुर्गापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आलेल्या या बनावट पदवी आणि गुणपत्रिकांच्या रॅकेटचा मुख्य सूत्रधार परिमल बाबुराव गौरकर हा उच्चशिक्षित असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी याआधी वैभव सोनुले या युवकाला अटक केली होती, तर आता मुख्य सूत्रधार परिमलला मदत करणाऱ्या अक्षय खोब्रागडे यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
हे संपूर्ण प्रकरण अत्यंत फिल्मी स्टाईलने उघडकीस आले. चंद्रपुरातील तुकूम परिसरातील एसटी वर्कशॉप चौकात राहणाऱ्या परिमलने जानेवारी महिन्यात एका स्थानिक शेजाऱ्याकडे एक कापडी पिशवी सुरक्षित ठेवण्यास दिली होती. मात्र, अनेक महिने उलटूनही परिमल ती पिशवी परत नेण्यासाठी आला नाही.
अखेर शेजाऱ्याने कुतूहलाने ती पिशवी उघडून पाहिली असता, त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. त्या पिशवीत देशातील व राज्यातील विविध नामांकित विद्यापीठांच्या बनावट पदव्या, मार्कशीट आणि प्रमाणपत्रे आढळून आली.
याबाबत शेजाऱ्याने विचारणा केली असता, लोकांकडून ५ ते १० लाख रुपये घेऊन बनावट प्रमाणपत्रे विकण्याचे काम आपण करत असल्याचे परिमलने फोनवर सांगितले होते. याप्रकरणी घाबरलेल्या शेजाऱ्याने तातडीने दुर्गापूर पोलिसांशी संपर्क साधून सर्व कागदपत्रे पोलिसांच्या स्वाधीन केली.
पोलिसांनी जप्त केलेली कागदपत्रे संबंधित विद्यापीठांकडे सत्यता तपासणीसाठी पाठवली असून ती बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे, शासकीय नोकरी मिळविण्यासाठी तसेच नोकरीत पदोन्नती (प्रमोशन) मिळवण्यासाठी या बनावट शैक्षणिक कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणावर वापर झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. नागपुरातून मुख्य सूत्रधार जाळ्यात अडकल्यामुळे या रॅकेटमधील आणखी काही मोठे चेहरे आणि लाभासार्थी उघडकीस येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
