tiger Attack: जनावरे चारण्यासाठी गेलेल्या २५ वर्षीय युवकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू

Bhairav Diwase
चंद्रपूर:-
चंद्रपूर जिल्हयातील मोहर्ली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मोहर्ली बीटमधील कक्ष क्रमांक १५४ मध्ये आज दुपारी १:०० वाजताच्या सुमारास वाघाच्या हल्ल्यात एका युवकाचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. विजय मधुकर मेश्राम (वय अंदाजे २५ वर्षे, रा. जुनोना) असे मृत पावलेल्या युवकाचे नाव असून, तो जंगलात गुरे चारण्यासाठी गेला असताना दबा धरून बसलेल्या वाघाने त्याच्यावर अचानक हल्ला केला आणि यात त्याचा जागीच मृत्यू झाला.


घटनेची माहिती मिळताच मोहर्लीचे वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे, दुर्गापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. शेगावकर व त्यांचे पथक, मानद वन्यजीव रक्षक मुकेश भांदककर तसेच क्षेत्रीय वनकर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस पंचनामा आणि घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण केल्यानंतर मृतकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे हलविण्यात आला.


वन विभागाकडून मृतकाची आई श्रीमती निरंजना मधुकर मेश्राम यांना तात्काळ आर्थिक मदत मौकेवरच सुपूर्द करण्यात आली. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सदर परिसरात कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले असून, जुनोना परिसरातील नागरिकांना आणि गावकऱ्यांना जंगलात जाताना सतर्क राहण्याचे आवाहन करत जनजागृती मोहीम राबवली जात आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मोहर्ली करत आहेत.