चंद्रपूर:- सांगा कोणत्या विद्यापीठाची गुणपत्रिका आणि पदवी हवी? पैसा फेका, आम्ही बनवून देऊ... शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या एका मोठ्या मार्कशीट आणि पदवी रॅकेटचा पर्दाफाश चंद्रपूरच्या दुर्गापूर पोलिसांनी केला आहे.
या प्रकरणी वैभव सोनुले नामक एका आरोपीला अटक करण्यात आली असून, रॅकेटचा मुख्य सूत्रधार परिमल गौरकर हा मात्र फरार आहे. मुख्य सूत्रधार मूळचा चंद्रपूरचा असून, तो सध्या राज्याच्या विविध भागात वास्तव्याला असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपींकडून बनावट कागदपत्रे आणि साहित्य जप्त केले आहे.
विशेष म्हणजे, प्रत्येक गुणपत्रिका आणि पदवीसाठी तब्बल ५ ते १० लाख रुपये उकळले जात होते. संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ, श्रीधर युनिव्हर्सिटी (पिलानी) तसेच छत्रपती शाहूजी महाराज युनिव्हर्सिटी (कानपूर) यांसारख्या नामांकित विद्यापीठांच्या नावाने बनावट गुणपत्रिका, डिप्लोमा आणि मायग्रेशन प्रमाणपत्रे या रॅकेटद्वारे तयार केली जात होती.
पोलीस तपास सध्या प्राथमिक अवस्थेत असून, आरोपींची मोडस ऑपरेंडी आणि व्याप्ती पाहता अनेक धक्कादायक बाबी उजेडात येण्याची शक्यता आहे. आधीच नोकरीत असलेले आणि पदोन्नतीस (प्रमोशन) पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी या बोगस रॅकेटमधून सर्वाधिक पदव्या मिळवल्या असल्याचा संशय वर्तवला जात आहे. या घटनेमुळे चंद्रपूरसह संपूर्ण शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.या प्रकरणाच्या तपासात आणखी कोणते नवे धागेदोरे हाती लागतात, याकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

