चंद्रपूर:- चंद्रपूर पोलीस मुख्यालयाकडे उजळणी कोर्ससाठी जात असलेल्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा भीषण रस्ता अपघातात जागीच मृत्यू झाला आहे.
हि घटना आज सकाळी चंद्रपूर मार्गावरील वलणी-बोर्डा गावाजवळ घडली. दोन वाहनांमध्ये झालेल्या जोरदार धडकेत महिला पोलीस विशाखा बनसोड यांचा गंभीर दुखापतीमुळे मृत्यू झाला.
विशाखा बनसोड यापूर्वी सावली पोलीस ठाण्यात कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांची तळोधी पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली होती आणि अवघ्या आठवड्यापूर्वीच त्या नवीन ठिकाणी रुजू झाल्या होत्या. आज सकाळी त्या आपल्या कर्तव्याचा भाग म्हणून चंद्रपूर पोलीस मुख्यालयात आयोजित उजळणी कोर्ससाठी निघाल्या होत्या, मात्र वाटेतच काळाने त्यांच्यावर झडप घातली.
अपघाताची बातमी वाऱ्यासारखी पसरताच पोलीस प्रशासनासह सर्वत्र प्रचंड शोककळा पसरली आहे.
