चंद्रपूर:- चंद्रपुरात यंदाही गणेशोत्सवात डीजेचा आवाज घुमणार आहे. याबाबतचा संभ्रम आता दूर झालाय. मात्र, पोलिसांच्या दणक्याने डीजे संचालकांना डेसीबल विषयक प्रतिज्ञापत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार नक्की आवाज कसा राहील, याविषयी डीजे सिस्टीमचा आवाजविषयक डेमो वरिष्ठ अधिकारी घेणार आहेत.
या नव्या घडामोडीनंतर आतापर्यंत सुमारे ४०० डीजे चालकांनी पोलिसांकडे प्रतिज्ञापत्रे सादर केली आहेत. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन न करता सण-उत्सव शांततेत आणि उत्साहात साजरे व्हावेत, यासाठी पोलीस प्रशासनाने ही विशेष मोहीम हाती घेतली आहे.
डीजे ऑपरेटर्सनी दिलेल्या शपथपत्रात, ठरवून दिलेल्या ध्वनी मर्यादेतच आवाज करण्याचे नियम मान्य करण्यात आले आहेत. नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड आणि कायदेशीर कारवाई मान्य असेल, असेही त्यात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे, जिल्ह्यात डीजेच्या या संपूर्ण व्यवसायावर सात ते आठ हजार लोकांचा रोजगार अवलंबून आहे. सुरुवातीला पोलिसांनी यंदाच्या सणात डीजेला परवानगी दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली होती. मात्र, यावर आता नियमांचे तंतोतंत पालन करण्याच्या अटीवर सुवर्णमध्य काढण्यात आला आहे.
