Chandrapur News: चंद्रपूर मनपाच्या अभ्यासिका आणि वाचनालयांची दुरवस्था

Bhairav Diwase
१५ दिवसांत सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या अभ्यासिका आणि वाचनालयांची अत्यंत दुरवस्था झाली असून, येत्या १५ दिवसांत येथील सुविधांमध्ये सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा 'एनएसयूआय'चे प्रदेश सचिव आशिष बोंडे यांनी एका पत्रपरिषदेत दिला आहे.


माजी महापौर संगीता अमृतकर यांनी यापूर्वीच अभ्यासिकेतील दुरवस्थेबाबत महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधले होते. मात्र, प्रशासनाकडून त्यावर कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. नुकत्याच करण्यात आलेल्या पाहणीत, गेल्या तीन महिन्यांपासून शौचालयाचे सांडपाणी थेट अभ्यासिकेत झिरपत असल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे तिथे प्रचंड अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरली असून विद्यार्थ्यांच्या अभ्यासात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. तसेच, स्पर्धा परीक्षांच्या नवीन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांचाही येथे मोठा तुटवडा जाणवत आहे.


सध्या महापालिकेतर्फे कस्तुरबा रोडवरील म. गांधी वाचनालय, सिव्हिल लाईन्सचे हुतात्मा स्मारक वाचनालय, बाबुपेठ येथील बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे अभ्यासिका, भानापेठ वार्डातील श्रद्धेय अटलबिहारी वाजपेयी अभ्यासिका आणि गंजवार्ड येथील श्री. कोलबा स्वामी महाराज अशी एकूण पाच अभ्यासकेंद्रे चालवली जातात. त्यापैकी भानापेठ आणि गंजवार्डातील अभ्यासिकांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे.
येत्या १५ दिवसांत महापालिका प्रशासनाने या सर्व व्यवस्था सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा एनएसयूआयचे प्रदेश सचिव आशिष बोंडे यांनी दिला आहे. या पत्रकार परिषदेत मनीष दास, सचिन हरणे आणि शुभम रत्नपारखी हे जण उपस्थित होते.