Rajura Firing News: राजुरा हत्याकांडाने चंद्रपूर हादरले: भरदिवसा न्यायालयासमोर गोळीबार

Bhairav Diwase
एकाचा मृत्यू; तर आरोपी अटकेत 
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक बातमी समोर येत आहे. राजुरा न्यायालयाच्या अगदी समोर भरदिवसा झालेल्या गोळीबाराच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. या गोळीबारात पापा ऊर्फ विनोद जाधव या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर दोन आरोपीला अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पापा जाधव हे राजुरा न्यायालयाच्या समोरील एका नारळ पाणीच्या दुकानात बसले होते. त्याच वेळी दुचाकीवरून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोन अज्ञात युवकांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार केला. आरोपींनी अगदी जवळून पापा जाधव यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या. यातील गोळ्या त्यांच्या डोक्यात लागल्याने ते गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.


भरवस्तीत आणि न्यायालयासारख्या संवेदनशील ठिकाणी झालेल्या या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच राजुरा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि तपास चक्रावले.


दरम्यान, या हत्येप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. गोळीबार केल्यानंतर पळून न जाता दोन्ही आरोपींनी थेट पोलीस ठाणे गाठले. करण दुर्गराज मेकलवार (वय २२ वर्ष) आणि करण दीपक बाविसकर (वय २१ वर्ष) या दोन्ही आरोपींनी स्वतःहून राजुरा पोलीस ठाण्यात जाऊन पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.


पोलिसांनी हत्येत वापरलेले शस्त्र (पिस्तूल) ताब्यात घेतले असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्येमागचे मूळ कारण काय? जुना वाद की पूर्ववैमनस्य? या दृष्टीने राजुरा पोलीस आता पुढील तपास करत आहेत.