Pratibha Dhanorkar रस्त्यावर उतरल्या खासदार प्रतिभा धानोरकर

Bhairav Diwase
‘सरप्राईज व्हिजिट’मध्ये वाहतूक पोलिसांचा सावळा गोंधळ उघडा

चंद्रपूर:- जिल्ह्यातील रस्ता सुरक्षेचा प्रश्न गंभीर असताना आयोजित रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीला अनेक प्रमुख विभाग प्रमुखांनी दांडी मारल्याने खासदार प्रतिभा धानोरकर चांगल्याच संतापल्या. त्यांनी ही बैठक तात्काळ रद्द करत बेजबाबदार अधिकाऱ्यांना 'कारणे दाखवा नोटीस' बजावण्याचे आदेश दिले आहेत.

चंद्रपूर जिल्ह्यात रस्ता सुरक्षेबाबत आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यासह अनेक प्रमुख विभाग प्रमुखांनी गैरहजेरी लावली. लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय शिस्तीचा हा अनादर असल्याचा आक्रमक पवित्रा घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी बैठक तात्काळ रद्द केली. तसेच समितीच्या सचिव तथा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांना या सर्व अनुपस्थित अधिकाऱ्यांना त्वरित ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावण्याचे स्पष्ट आदेश दिले. यावेळी विधान परिषद आमदार सुधाकर अडबाले यांचीही विशेष उपस्थिती होती.

बैठक रद्द केल्यानंतर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी थेट शहराच्या मुख्य रस्त्यांवर उतरून पाहणी केली. रस्त्यावर अस्ताव्यस्त उभ्या राहणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्सवर तात्काळ दंडात्मक कारवाईचे निर्देश त्यांनी दिले. खासदारांच्या या अचानक आलेल्या 'सरप्राईज व्हिजिट'मुळे प्रशासनाची धावपळ उडाली आणि वाहतूक पोलिसांचा सावळा गोंधळ उघडा पडला.


पाहणीदरम्यान वाहतूक निरीक्षक बारापात्रे हे स्वतः ट्रॅव्हल्स मालकांना गाड्या हटवण्याच्या सूचना देत असल्याचे निदर्शनास आले. यावर प्रशासकीय आडोशाखाली चालणाऱ्या हलगर्जीपणाबद्दल खासदारांनी संबंधितांना चांगलेच खडे बोल सुनावले.


शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘ट्रक टर्मिनल’साठी राखीव जागा शोधण्याचे आणि खाजगी ट्रॅव्हल्स मालकांना स्वतःची पार्किंग व्यवस्था उभारण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. "जनतेच्या जीवाशी खेळणारा निष्काळजीपणा अजिबात सहन केला जाणार नाही," असा कडक इशारा त्यांनी दिला आहे.


या धडक कारवाईवेळी जिल्हाधिकारी वसुमना पंत, आमदार सुधाकर अडबाले, मनपा आयुक्त अकुनुरी नरेश, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपप्रादेशिक परिवहन सहाय्यक अधिकारी रावसाहेब रगडे, वाहतूक निरीक्षक अमोल बारापात्रे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. खासदारांच्या या आक्रमक भूमिकेचे चंद्रपूर शहरातील नागरिकांमधून जोरदार स्वागत होत आहे.