Ashram School Food poisoning आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा

Bhairav Diwase
चंद्रपूर:- जेवणातून आश्रमशाळेतील ३१ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील नगराळा येथील अंब्रू नाईक माध्यमिक आश्रमशाळेत घडली आहे. या घटनेमुळे पालक आणि स्थानिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार नेहमीप्रमाणे नेहमीच्या वेळेत विद्यार्थ्यांना दुपारी जेवण देण्यात आले होते. मात्र, हे जेवण घेतल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांच्या प्रकृतीत बिघाड झाला. विद्यार्थ्यांना मळमळ, उलट्या, पोटदुखी आणि चक्कर येण्याची लक्षणे दिसू लागल्याने शाळा प्रशासनाची तारांबळ उडाली.

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शाळा प्रशासनाने तातडीने बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी राजुरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. सध्या या सर्व ३१ मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, अन्नामुळे ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. शाळा प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे आणि निष्काळजीपणामुळे पालकांमध्ये तीव्र रोष व्यक्त होत आहे. निष्पाप चिमुकल्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या दोषी कर्मचारी आणि संस्थाचालकांवर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी आता संतप्त पालक आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे.