पोंभुर्णा:- चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात पावसाने गेल्या महिनाभरापासून पाठ फिरवल्यामुळे धान उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पावसाअभावी पिके पिवळी पडू लागली असून त्यावर 'करप्या' रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. पाऊस न पडल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत.
गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारल्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाअभावी तागाची आणि बहरलेली धान पिके आता पिवळी पडू लागली आहेत. पावसाच्या अभावामुळे धान पिकावर 'करप्या' रोग पडला आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे पिकांची वाढ खुंटली असून पाऊस न पडल्यास हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. महिनाभर पावसाचा पत्ता नाही, विहिरी आणि बोरवेलची पाणीपातळी खालावली आहे. अशा परिस्थितीत महागडी औषधे आणि खतांचा खर्च कसा फेडायचा, असा प्रश्न बळीराजासमोर उभा ठाकला आहे. जर येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाही, तर धान पिकाचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी पूर्णपणे आर्थिक संकटात सापडणार आहे.
