Chandrapur News: चंद्रपूर शहरातील लालपेठ महाशिवलिंग मंदिराचे बांधकाम ‘अनधिकृत’

Bhairav Diwase
काम बंद व बांधकाम हटविण्याची नोटीस; पुरातत्त्व विभागाचा दणका
चंद्रपूर:- आमदार किशोर जोरगेवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपुरातील लालपेठ येथील ऐतिहासिक व संरक्षित महाशिवलिंग मंदिराच्या जीर्णोद्धाराचा भव्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. एकीकडे या धार्मिक सोहळ्याची आणि महारुद्राभिषेकाची जय्यत तयारी सुरू असतानाच, भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने (ASI) या सोहळ्याला आणि येथील बांधकामास मोठा दणका दिला आहे. राष्ट्रीय महत्त्वाच्या संरक्षित स्मारकाच्या प्रतिबंधित क्षेत्रात नियमांचे उल्लंघन करून बांधकाम केल्याचा ठपका ठेवत पुरातत्त्व विभागाने लालपेठ विशाल शिवलिंग मंदिर सेवा समितीला सक्त नोटीस बजावली आहे.

मंदिराचे बांधकाम ‘अनधिकृत’: 

चंद्रपुरातील ‘एकाश्म, चंद्रपूर’ (शिवलिंग) हे भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अखत्यारितील राष्ट्रीय महत्त्वाचे संरक्षित स्मारक आहे. ‘प्राचीन स्मारके व पुरातत्त्वीय स्थळे आणि अवशेष अधिनियम, १९५८’ (Ancient Monuments and Archaeological Sites and Remains Act, 1958) मधील कलम २०-अ नुसार, संरक्षित स्मारकाच्या हद्दीपासून सर्व दिशांना १०० मीटरपर्यंतचा परिसर हा 'प्रतिबंधित क्षेत्र' (No-Construction Zone) म्हणून घोषित करण्यात आला आहे. या क्षेत्रात कोणत्याही प्रकारच्या नवीन बांधकामास कायदेशीर मनाई आहे.


मात्र, या नियमांना डावलून शिवलिंगाभोवती ग्रॅनाईटचा थर देण्याचे आणि परिसरात सिमेंटचे गट्टू बसवण्याचे अनधिकृत काम करण्यात आल्याचे पुरातत्त्व विभागाच्या नियमित पाहणीदरम्यान निदर्शनास आले. स्थानिक आमदार किशोर जोरगेवार यांच्या स्वनिधीतून हे विकासकाम केल्याची चर्चा असून, याप्रकरणी 'लोक आंदोलन न्यास'चे जिल्हाध्यक्ष नितीन बन्सोड यांनीही पुरातत्त्व विभागाकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती.


पुरातत्त्व विभागाचे स्पष्ट निर्देश:

पुरातत्त्व विभागाने बजावलेल्या नोटिशीनुसार, प्रतिबंधित क्षेत्रातील हे अनधिकृत बांधकाम तात्काळ थांबवून उभारण्यात आलेल्या संरचना, साहित्य आणि यंत्रसामग्री काढून घेण्यात यावी आणि परिसर पूर्ववत मूळ स्थितीत आणण्यात यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. संबंधित मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नोटीस स्वीकारण्यास टाळाटाळ केल्यामुळे अधिकाऱ्यांनी अखेर स्थळावरच नोटीस चिटकवली. नियमांचे उल्लंघन केल्यास कायद्यानुसार दोन वर्षांपर्यंतचा कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे नमूद करत विभागाने पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केली आहे.


अमृता फडणवीस यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या दिमाखदार सोहळ्याच्या स्वागतासाठी शहरात फलक, कमानी आणि जय्यत तयारी पाहायला मिळत असतानाच, पुरातत्त्व विभागाच्या या कारवाईमुळे एका बाजूला धार्मिक उत्साह आणि दुसऱ्या बाजूला प्रशासकीय व कायदेशीर संघर्ष अशी विरोधाभासी स्थिती चंद्रपुरात निर्माण झाली आहे.