Pombhurna News: चेकठाणेवासना येथे वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू; पत्नी गंभीर जखमी

Bhairav Diwase

पोंभुर्णा:-
पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथे शेतातील काम आटोपून घरी परतत असताना अचानक अंगावर वीज कोसळल्याने एका ५५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली आहे.


चेकठाणेवासना येथील केशव डोनु गुडी (वय ५५ वर्षे) आणि त्यांची पत्नी वैशाली केशव गुडी (वय ४५ वर्षे) असे दांपत्य नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कामानिमित्त गेले होते. दिवसभराचे काम आटोपून दोघेही संध्याकाळी घरी परतत असताना, वाटेत ऋषी आलाम यांच्या शेताजवळ अचानक हवामान बदलून वीज कोसळली. या अंगावर वीज पडण्याच्या तीव्र झटक्यात केशव गुडी यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी वैशाली गुडी या गंभीर जखमी झाल्या.


घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी तात्काळ मदत करत जखमी वैशाली गुडी यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय, पोंभूर्णा येथे दाखल केले. परंतु, प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे.


या अचानक झालेल्या दुर्घटनेमुळे चेकठाणेवासना गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.