Chandrapur News: जल-जंगल-जमिनीचा लढा अभ्यासक्रमात!

Bhairav Diwase
कवी अविनाश पोईनकरांच्या ‘दंडकारुण्य’ची पुणे विद्यापीठाकडून दखल
चंद्रपूर:- चंद्रपूरच्या मातीतून उमललेल्या एका संवेदनशील कवितेने आज महाराष्ट्राच्या साहित्य आणि शैक्षणिक वर्तुळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.


चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून आलेल्या युवा कवी अविनाश पोईनकर यांच्या ‘दंडकारुण्य’ या बहुचर्चित कवितासंग्रहाची आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दखल घेतली आहे. एम.ए. मराठी प्रथम वर्षाच्या दुसऱ्या सत्राच्या अभ्यासक्रमात संपूर्ण ‘दंडकारुण्य’ कवितासंग्रहाचा समावेश करण्यात आला आहे.


आदिवासी जीवन, जल-जंगल-जमिनीचा हक्क, पर्यावरणाचा ऱ्हास आणि विस्थापनाचे जळते प्रश्न मांडणारा ‘दंडकारुण्य’ हा कवितासंग्रह साहित्य विश्वात आधीपासूनच चर्चेत आहे. या संग्रहाला यापूर्वी अनेक प्रतिष्ठित साहित्य पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कवितांची व्याप्ती आता केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही. 


‘दंडकारुण्य’चा इंग्रजी आणि बंगाली भाषांमध्येही अनुवाद पूर्ण झाला असून, तो लवकरच वाचकांच्या भेटीस येत आहे. याशिवाय, छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी महाविद्यालयाच्या बी.ए. अभ्यासक्रमात पोईनकर यांच्या ‘मातृसत्तेच्या हातात’ या कवितेचा समावेश करण्यात आला आहे.


चंद्रपूरच्या ग्रामीण भागातील एका ध्येयवादी युवा कवीचा हा प्रवास केवळ वैयक्तिक यश नसून, उपेक्षित आणि संघर्षाची भाषा बोलणाऱ्या कवितांचा विद्यापीठीय पातळीवर झालेला बहुमान मानला जात आहे.