सावली:- चंद्रपूर जिल्ह्यातील सावली येथील नामांकित रमाबाई आंबेडकर विद्यालयात १० व्या वर्गात शिकणारा १५ वर्षीय विद्यार्थी नैतिक विठ्ठल शेडमाके हा गोसेखुर्द कालव्यातील पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेला आहे
मिळालेल्या माहितीनुसार, नैतिक हा आपल्या इतर दोन मित्रांसोबत गोसेखुर्द कालव्यावर आंघोळीसाठी गेला होता. आंघोळ करत असताना अचानक पाण्याच्या जोरदार प्रवाहाचा अंदाज न आल्याने नैतिक पाण्यात वाहून जाऊ लागला. मित्राला डोळ्यांसमोर वाहून जाताना पाहून सोबत आलेले दोन्ही मित्र तीव्र घबराटीखाली आले आणि त्यांनी तेथून पळ काढला.
भीतीपोटी मित्रांनी या घटनेबाबत कोणालाही काहीही सांगितले नाही. नैतिक संध्याकाळ झाली तरी घरी न पोहोचल्याने त्याच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र, त्याचा कोणताही थांगपत्ता लागला नाही. अखेर आज संशय आल्याने मित्रांकडे विचारपूस केली असता, त्यांनी कालव्यावर घडलेली सर्व सत्य घटना सांगितली.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सावली पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची पाहणी केली असून, स्थानिक बचाव पथक व आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने गोसेखुर्द कालव्यात शोधमोहीम वेगाने राबवली जात आहे. कालव्यातील पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने शोधकार्यात अडचणी येत असल्या तरी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.
