Suicide News: खाकीचे स्वप्न अधुरेच; अकॅडमीत शिक्षकाकडून मानसिक त्रास

Bhairav Diwase
२५ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य!

पुणे:- पुणे जिल्ह्यातील आळेफाटा परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पोलिस दलात भरती होऊन आपल्या कुटुंबाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अहोरात्र जिद्दीने आणि कष्टाने सराव करणाऱ्या एका २५ वर्षीय तरुणीने, अकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक त्रासाला आणि अपमानाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत आपले आयुष्य संपवले. यायेथील सह्याद्री अकॅडमीतील शिक्षकाच्या मानसिक छळाला कंटाळून एका तरुणीने सोमवारी (ता. १०) गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी शिक्षक मयूर अशोक डुंबरे (रा. खामुंडी, ता. जुन्नर) याच्याविरुद्ध आळेफाटा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


भाग्यश्री भास्कर भंडारी (मूळ रा. आळकुटी, जि. अहिल्यानगर) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. तर मृत भाग्यश्रीची बहीण शीतल भंडारी हिने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मृत भाग्यश्री ही आळेफाटा येथे राहून पोलिस भरतीचा सराव करत होती.


काही दिवसांपूर्वी झालेल्या एका वादातून शिक्षक मयूर डुंबरे याला पोलिस ठाण्यात जावे लागले होते. याचा राग धरून डुंबरेने भाग्यश्रीला वर्गात इतर विद्यार्थ्यांसमोर अपमानास्पद वागणूक देऊन तिचा मानसिक छळ सुरू केला होता. या त्रासाला कंटाळून भाग्यश्रीने टोकाचे पाऊल उचलले.