Chandrapur News: वाघ खाली अन् कर्मचारी पोलवर!

Bhairav Diwase
चंद्रपुरात वीजदुरुस्ती दरम्यान घडला अंगावर काटा आणणारा थरार!
चंद्रपूर:- वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्यांसमोर अचानक साक्षात यमदूत म्हणजेच एक भला मोठा वाघ उभा राहिला. वाघाला पाहताच कर्मचाऱ्यांची भंबेरी उडाली आणि स्वतःचा जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता थेट विजेचा पोल गाठला!


चंद्रपूर जिल्ह्यातील मूल उपविभागात येणाऱ्या फुलझरी गावातील घटना आहे. जंगलालगत असलेल्या वीजवाहिनीच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम करण्यासाठी महावितरण कर्मचाऱ्यांची एक तुकडी पोहोचली होती. सर्व कर्मचारी आपल्या कामात व्यस्त असतानाच अचानक जवळच्या दाट झुडपातून एक भला मोठा वाघ बाहेर आला!


कर्मचाऱ्याने थेट विजेच्या पोलवरच चढून बसणे पसंत केले! तर इतर सहकाऱ्यांनी सुरक्षित अंतरावर पळ काढला. थरार एवढ्यावरच थांबला नाही... वाघ चक्क त्या विजेच्या पोलच्या खाली आणि आजूबाजूला घिरट्या घालत राहिला! त्यामुळे पोलवर चढलेला कर्मचारी तब्बल एक तास काळजाचा ठोका चुकवून वरच ताटकळत बसून राहिला.


जवळपास एक तासानंतर वाघ हळूहळू जंगलाच्या दिशेने निघून गेला. वाघ पूर्णपणे दृष्टीआड झाल्याची खात्री पटल्यानंतरच या कर्मचाऱ्याने सुटकेचा निश्वास सोडला आणि खाली उतरला. या थरारक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.