Chandrapur News: चंद्रपुरात AIMIM नगरसेवकावर मध्यरात्री प्राणघातक हल्ला!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- शहर महानगरपालिकेतील AIMIM चे नगरसेवक अजहर शेख यांच्यावर मध्यरात्री धारदार शस्त्राने भीषण आणि प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. ही घटना काल रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली. अजहर शेख हे त्यांच्या मालकीच्या 'अरेबियन ताज' या बिर्याणी हॉटेलमध्ये उपस्थित असताना, अचानक १० ते १५ अज्ञातांच्या टोळक्याने आत घुसून त्यांच्यावर शस्त्रांनी सपासप वार केले.


या हल्ल्यात अजहर शेख गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी दिलेल्या जबाबात थेट काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. काँग्रेस नगरसेविका सोफिया खान यांचे पती तवंगर खान, त्यांचे नातेवाईक आणि पराभूत उमेदवार सोहेल रजा यांनीच हा कट रचून हल्ला घडवून आणल्याचा दावा त्यांनी केला आहे.

या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपूर शहरात खळबळ उडाली असून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.