LCB Chandrapur: चंद्रपुरातील जबरी चोरीचा आंतरजिल्हा सूत्रधार अकोल्यातून जेरबंद!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- चंद्रपूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) आंतरजिल्हा गुन्हेगारांविरुद्ध एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. शहरात वाढत्या जबरी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी राबवलेल्या विशेष शोधमोहीम दरम्यान रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जबरी चोरीच्या गुन्ह्यांची अवघ्या काही दिवसांत यशस्वी उकल करण्यात आली आहे.


चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे व त्यांच्या पथकाने ही मोहीम राबवली. घटनास्थळावरील CCTV फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक तात्काळ अकोला जिल्ह्यातील दहीहांडा परिसरात पोहोचले. तेथून दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

मुस्तफा उर्फ शानू जमील खान (वय 44 वर्षे, रा. मोमीनपुरा, नागपूर)
 
सलमान अब्दुल रेहमान (वय 25 वर्षे, रा. दहीहांडा, जि. अकोला)


या कारवाईत पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून एकूण ₹3,14,500/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आरोपी मुस्तफाकडून: गुन्ह्यात वापरलेली बजाज पल्सर मोटारसायकल, मोबाईल, हेल्मेट व बॅग (अंदाजे ₹84,000).

आरोपी सलमानकडून: सोन्याच्या दागिन्यांच्या विक्रीतून मिळालेली रक्कम व इतर मालमत्ता (अंदाजे ₹2,30,500).

तपासादरम्यान निष्पन्न झाले की, मुस्तफा हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर नागपूर शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करून तब्बल 34 तोळे सोने लांबविल्याची कबुली देखील दिली आहे.


स्थानिक गुन्हे शाखेच्या या कौशल्यपूर्ण कारवाईमुळे रामनगर पोलीस ठाण्यातील दोन जबरी चोरीचे गुन्हे (अप.क्र. 1004/2026 व 996/2026)
 नागपूर शहरातील पाचपावली पोलीस ठाण्यातील एक मोठा घरफोडीचा गुन्हा (अप.क्र. 489/2026)


असे एकूण तीन मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत. दोन्ही आरोपींना वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाईसाठी रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, त्यांच्याकडून आणखीही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.