Accident News: चहा पिऊन परतताना काळाचा घाला!

Bhairav Diwase
बल्लारपूर–बामणी महामार्गावर भीषण अपघात; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
बल्लारपूर:- बल्लारपूर–बामणी महामार्गावर सोमवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात १९ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर त्याचे दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
चहा पिऊन घराकडे परतत असताना, दुचाकी अचानक घसरून मागून येणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली गेल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांचा आक्रोश पाहायला मिळाला असून, अपूर्ण रस्त्यामुळेच हा बळी गेल्याचा आरोप करत नागरिकांनी रस्ता रोखून धरला होता.


सोमवारी सायंकाळच्या सुमारास बामणी येथील अमितनगरचे रहिवासी असलेले तीन तरुण चहा पिऊन दुचाकीने परतत होते. याच दरम्यान बल्लारपूर–बामणी महामार्गावर दुचाकी अचानक अनियंत्रित होऊन घसरली आणि मागून येणाऱ्या ट्रकच्या मागील चाकाखाली आली.
या दुर्दैवी घटनेत १९ वर्षीय रुपेश संजय भोयर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर चंद्रशेखर दयानंद कस्तुरे आणि विशाल उमेश खामनकर हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.


अपघाताची माहिती मिळताच अमितनगर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आणि अपूर्ण रस्त्याच्या कामामुळे हा अपघात घडल्याचा आरोप करत संतप्त नागरिकांनी मृतदेह उचलण्यास ठाम नकार दिला.


मृताच्या कुटुंबाला योग्य नुकसानभरपाई द्या, अपूर्ण रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा आणि या मार्गावर पर्यायी 'रिंग रोड' उभारा, अशा प्रमुख मागण्यांसाठी नागरिकांनी प्रशासनाला घेरले. अखेर बल्लारपूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी केली आणि योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. सध्या बल्लारपूर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.