वरोरा:- मागील दोन ते तीन वर्षांपासून आपल्या हक्काच्या शेत रस्त्यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवणाऱ्या एका हताश शेतकऱ्याला अखेर न्याय मिळण्याऐवजी महसूल प्रशासनाच्या चुकीच्या निर्णयाचा फटका बसला आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी मूळ जागा सोडून भलत्याच जागेवरून रस्ता देण्याचा वादग्रस्त आदेश काढल्याच्या निषेधार्थ संतप्त शेतकऱ्याने थेट वरोरा तहसील कार्यालयाच्या आवारात आपली बैल बंडी सोडत अभिनव आंदोलन केले. या आंदोलनामुळे तहसील परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
काय आहे नेमके प्रकरण?
बोरगाव देशपांडे येथील पीडित शेतकरी श्रीकृष्ण ऋषी देवतळे यांनी चिंचोलकर नामक व्यक्तीकडून शेतजमीन खरेदी केली होती. मात्र, या शेतात जाण्यासाठी हक्काचा रस्ता नसल्याने त्यांनी गेली दोन ते तीन वर्षे महसूल विभागाकडे सतत पाठपुरावा केला. स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर, नायब तहसीलदार यांनी २६ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांना कायदेशीर रस्ता देण्याचा अधिकृत आदेश दिला होता.
एसडीओंचा (SDO) वादग्रस्त आणि एकतर्फी निर्णय
नायब तहसीलदारांच्या या आदेशाविरुद्ध काही शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी (SDO) कार्यालयात अपील दाखल केले. मागील तीन ते चार महिन्यांपासून हे प्रकरण प्रलंबित होते. मात्र, यावर निकाल देताना उपविभागीय अधिकाऱ्यांनी मूळ आदेशाच्या पूर्णपणे विरुद्ध जात, ज्या शेतकऱ्यांचा संबंधित जमिनीशी कोणताही थेट संबंध नाही, अशा जागेवरून रस्ता देण्याचा अजब आदेश पारित केला.
विशेष म्हणजे, हा निर्णय घेताना ज्या शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष शेतातून रस्ता दाखवण्यात आला, त्यांची कोणतीही सुनावणी घेण्यात आली नाही, की त्यांना बाजू मांडण्याची संधी दिली नाही. या एकतर्फी निर्णयामुळे संबंधित शेतकरी आता तिथून रस्ता देण्यास तयार नसल्याने वहिवाटीचा हा प्रश्न अधिकच गुंतागुंतीचा आणि गंभीर बनला आहे.
‘प्रहार’चा आक्रमक इशारा
प्रशासनाच्या या आडमुठ्या आणि अन्यायकारक धोरणामुळे संतप्त झालेल्या शेतकरी श्रीकृष्ण देवतळे यांनी अखेर 'प्रहार शेतकरी संघटने'चे दार ठोठावले. संघटनेच्या नेतृत्वात थेट वरोरा तहसील कार्यालय गाठून त्यांनी कार्यालयाच्या आवारातच आपली बैल बंडी सोडून तीव्र संताप व्यक्त केला. महसूल विभागाने या संवेदनशील प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून शेतकऱ्याला हक्काचा व योग्य शेत रस्ता मिळवून द्यावा; अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर डुकरे यांनी दिला आहे.

