चंद्रपूर:- चंद्रपूर येथील रामनगर पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मित्र नगर परिसरात एका इसमाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हि घटना 25 जूनला रात्रौ 10:30 वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत इसमाचे नाव संतोष अरुण भेंडे असून, तो मूळचा अमरावती जिल्ह्यातील पाला येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. मित्र नगर परिसरात संतोष भेंडे यांच्यावर एका अज्ञात इसमाने बाईकवर येत दगडाने डोक्यावर वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की, संतोष भेंडे यांचा जागेवरच मृत्यू झाला.
हल्लेखोर हा बाईकने आला होता आणि त्याने संतोष यांच्यावर हल्ला करून घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली. उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले आणि रामनगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांनी तातडीने आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले असून मृतदेहाचा पंचनामा सुरू केला आहे.

