अँकर:- चंद्रपूर शहरातील महाऔष्णिक विद्युत केंद्राकडे जाणाऱ्या मुख्य मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने तुलसी नगर, वृंदावन नगर आणि परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
आज तुकूम प्रभागाचे नगरसेवक राहुल विरुटकर हे याच मार्गावरील खड्ड्यात दुचाकीसह घसरून पडले. या घटनेनंतर त्यांनी संतप्त होत आपली दुचाकी रस्त्यातच ठेऊन आंदोलन सुरू केले.
महाऔष्णिक विद्युत केंद्राचे अधिकारी घटनास्थळी येऊन रस्ता दुरुस्तीबाबत ठोस निर्णय घेत नाहीत, तोपर्यंत वाहन हटवणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. या आंदोलनामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

