चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातील मित्रनगर चौकात गुरुवारी मध्यरात्री एका ४८ वर्षीय इसमाची लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आणि दगडाने वार करीत निघृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण चंद्रपुरात एकच खळबळ उडाली आहे. मात्र, रामनगर पोलिसांनी कमालीची तत्परता दाखवत अवघ्या काही तासांतच आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
संतोष अरुण भेंडे, वय ४८ वर्षे, रा. पाळा जिल्हा अमरावती असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर अजय उर्फ ॲप्पल शंकर पोहनकर, वय १९ वर्षे, राहणार मित्रनगर, चंद्रपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार अनैतिक संबंधाच्या संशयातून घडल्याचे समोर आले आहे.
गुरुवारी मध्यरात्री 'डायल ११२' वर मित्रनगर परिसरात भांडण सुरू असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले, मात्र तोपर्यंत संतोष भेंडे हे रक्ताच्या थारोळ्यात मृत पडले होते.
घटना घडताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले व रामनगर पोलीस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी रात्रीच बस स्टँड, रेल्वे स्टेशन आणि शहरातील निर्जन स्थळांवर शोधमोहीम राबवली. सुरुवातीला कोणताही सुगावा लागला नाही. मात्र, २६ जूनच्या सकाळी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. यादरम्यान, संशयित आरोपी अजय पोहनकर हा वडगाव परिसरात लपून बसल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ सापळा रचून त्याला वडगावमधून ताब्यात घेतले.
पोलिसांनी आरोपी 'ॲप्पल' पोहनकर याची कसून चौकशी केली असता, त्याने आपला गुन्हा कबूल केला आहे. मृत संतोष भेंडे हा अजयच्या घरी यायचा आणि घरातील महिलांना त्रास द्यायचा, याच रागातून अजयच्या मनात संतोषबद्दल असंतोष धुमसत होता. गुरुवारी रात्री दोघे मित्रनगर चौकात समोरासमोर आले. तिथे त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि रागाच्या भरात अजयने संतोषला लाथाबुक्क्यांनी व दगडाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत संतोष सिमेंटच्या झाकणावर कोसळला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. संतोष फक्त बेशुद्ध पडला आहे असे समजून आरोपीने तिथून पळ काढला होता.
अनैतिक संबंधाचा संशय आणि घरच्या महिलांना होणाऱ्या त्रासाचा बदला घेण्यासाठी एका १९ वर्षाच्या तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलले. या प्रकरणाचा पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.

