Mul Crime News: जुन्या वैमनस्यातून दुचाकीस्वारांना ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न

Bhairav Diwase
मुल:- जुन्या वैमनस्यातून दोन दुचाकीस्वार युवकांना थेट ट्रॅक्टरखाली चिरडून मारण्याचा थरारक प्रयत्न करण्यात आलाय. केळझर-गोंडसावरी मार्गावर भरदिवसा हा सगळा प्रकार घडला असून या घटनेमुळे परिसरात तीव्र खळबळ उडाली आहे.


नागाळा येथील विनोद पिल्लरवार आणि वरुण ढोडरे हे दोघे मित्र नेहमीप्रमाणे दुचाकीने जेवणाचा डबा देण्यासाठी जात होते. केळझर-गोंडसावरी मार्गावर आल्यानंतर त्यांनी पुढे चाललेल्या एका ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले. नेमका याच गोष्टीचा राग मनात धरून, ट्रॅक्टर चालक आनंद कुकुडकार याने आपल्या ताब्यातील विना क्रमांकाचा ट्रॅक्टर थेट या दुचाकीला पाठीमागून जोरात धडकावला.


धडक इतकी भीषण होती की दोन्ही युवक रस्त्यावर फेकले गेले. पण एवढ्यावरच आरोपीचा राग शांत झाला नाही, त्याने चक्क दोन ते तीन वेळा ट्रॅक्टर मागे-पुढे करत या जखमी युवकांच्या अंगावर चढवून त्यांना जागीच ठार मारण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जखमींनी याला जाब विचारला, तेव्हा आरोपीने ट्रॅक्टरमधून उतरून त्यांना काठीने बेदम मारहाण करायला सुरुवात केली.


हा थरार इथेच थांबला नाही. आरोपी आनंदने जवळच शेतात काम करणाऱ्या आपल्या सासऱ्याकडून थेट कुऱ्हाड हातात घेतली आणि तो या दोघांच्या अंगावर धावून गेला. जीव वाचवण्यासाठी या दोन्ही मित्रांनी तिथून पळ काढला. याप्रकरणी मूल पोलिसांनी पीडितांच्या तक्रारीवरून आरोपी आनंद मोरेश्वर कुकुडकार याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद केली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.