जटपुरा गेट परिसरात सापळा, दोघांना बेड्या!
चंद्रपूर:- चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ड्रग्ज तस्करांविरोधात कारवाई केली आहे. जटपुरा गेट परिसरातून तब्बल १०४.२१० ग्रॅम 'एम.डी.' म्हणजेच मेफेड्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. जप्त करण्यात आलेल्या एकूण मुद्देमालाची किंमत ६ लाख २३ हजार रुपयांच्या घरात आहे.
चंद्रपूरच्या जटपुरा गेट परिसरातील 'इटनकर पान मंदिर' जवळ एम.डी. ड्रग्जची विक्री होणार असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीच्या पथकाने या भागात सापळा रचला.
पोलिसांनी संशयावरून ओम संतोष इटनकर (वय २५ वर्षे, रा. जटपुरा वॉर्ड) याला ताब्यात घेतले. त्याची आणि त्याच्या घराची कसून झडती घेतली असता, पोलिसांचेही डोळे पांढरे झाले. त्याच्याकडे १०४.२१० ग्रॅम वजनाचे घातक एम.डी. ड्रग्ज, दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम मिळून आली.
पोलिसांनी जेव्हा आरोपी ओम इटनकरची प्राथमिक चौकशी केली, तेव्हा या ड्रग्ज रॅकेटचे धागेदोरे थेट बगडखिडकी परिसरापर्यंत पोहोचले. ओमने हे ड्रग्ज बगडखिडकी येथील रहिवासी इरफान उर्फ भुऱ्या पठाण याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली. पोलिसांनी वेळ न गमावता तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तात्काळ चक्र फिरवून दुसरा आरोपी इरफान उर्फ भुऱ्या पठाण यालाही बेड्या ठोकल्या.
जप्त मुद्देमाल
एम.डी. (Mephedrone): १०४.२१० ग्रॅम
मोबाईल: २ नग
एकूण जप्त किंमत: ६,२३,३७०/-
या प्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरोधात एनडीपीएस (NDPS) कायद्याच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि विनोद भुरले, सुनील गौरकार, संतोष निंभोरकर, डोके आणि एलसीबी व श्वान पथकाच्या अंमलदारांनी केली आहे.

