कोरपना:- रस्त्यावरील वाढते अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी गडचांदूर पोलीस स्टेशनतर्फे अल्पवयीन वाहनचालकांविरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी शहरात ठिकठिकाणी तपासणी करून २१ अल्पवयीन दुचाकी चालकांवर थेट कारवाई केली.
नक्की काय घडले?
गडचांदूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुले बेधडकपणे भरधाव वेगाने दुचाकी चालवत असल्याच्या तक्रारी व निरीक्षण समोर येत होते. अपघातांचा धोका टाळण्यासाठी गडचांदूर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक शिवाजी कदम यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपासणी पथक तयार करण्यात आले. मोहिमेदरम्यान नियमांचे उल्लंघन करून गाड्या चालवणाऱ्या २१ अल्पवयीन मुलांना दुचाकींसह ताब्यात घेण्यात आले व त्यांच्या गाड्या पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या.
पालकांना बोलावून कडक समज व दंड:
गाड्या जप्त केल्यानंतर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलांच्या पालकांना तात्काळ पोलीस ठाण्यात पाचारण केले. अल्पवयीन मुलांना वाहने चालवायला देणे हे कायद्याने गुन्हा असून यामुळे मुलांच्या व इतरांच्या जिवाला धोका निर्माण होतो, याची जाणीव पोलिसांनी पालकांना करून दिली. त्यानंतर प्रत्येक वाहनचालकाकडून प्रत्येकी ₹१,००० रुपये दंड वसूल करून, पुन्हा असा प्रकार न घडण्याची कडक समज देऊनच दुचाकी पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्या.
पोलीस प्रशासनाचे आवाहन:
१८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या पाल्यांच्या हाती दुचाकी अथवा चारचाकी वाहने देऊ नका. अल्पवयीन मुलांचे वाहन चालवणे हा केवळ वाहतूक नियमांचा भंग नसून पाल्यांच्या सुरक्षेशी खेळ आहे. भविष्यात अशा मोहिमा अधिक तीव्र केल्या जातील," असे आवाहन गडचांदूर पोलीस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.
