Fact Check : गडचिरोलीबाबत जुने व अन्य राज्यातील फोटो प्रसारित करून दिशाभूल

Bhairav Diwase
गडचिरोली:- गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था आणि रस्त्यांच्या स्थितीबाबत जुनी, वस्तुस्थितीशी विसंगत तसेच अन्य राज्यांतील छायाचित्रे गडचिरोलीतील असल्याचे भासवून प्रसारित केली जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. अशा पोस्टमुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची तसेच जिल्ह्याबाबत चुकीची प्रतिमा निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोणतीही माहिती खातरजमा केल्याशिवाय प्रसारित अथवा फॉरवर्ड करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले आहे.


तेलंगणातील जुना फोटो गडचिरोलीचा असल्याचा दावा

सध्या सोशल मीडियावर एक छायाचित्र प्रसारित केले जात असून, त्यामध्ये एक आरोग्य कर्मचारी रुग्णाला झोळीच्या सहाय्याने दुर्गम भागातून घेऊन जाताना दिसत आहे. हे छायाचित्र गडचिरोली जिल्ह्यातील असल्याचे भासवून त्याच्या आधारे जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

मात्र, प्रशासनाने केलेल्या पडताळणीत सदर छायाचित्राचा गडचिरोली जिल्ह्याशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट झाले आहे. हे छायाचित्र महाराष्ट्रातील नसून तेलंगणा राज्यातील आहे. तसेच ते सध्याचे नसून सुमारे आठ वर्षांपूर्वीचे आहे. १९ जुलै २०१८ रोजी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत ‘ट्विटर’ खात्यावरून हे छायाचित्र प्रसारित करण्यात आले होते. दुर्गम भागातील एका आजारी व्यक्तीला आरोग्यसेवा मिळवून देण्यासाठी केलेल्या प्रयत्नाच्या अनुषंगाने संबंधित आरोग्य कर्मचाऱ्याच्या कार्याची दखल घेत हे छायाचित्र त्यावेळी प्रसारित करण्यात आले होते.

त्यामुळे जुने आणि अन्य राज्यातील छायाचित्र गडचिरोलीतील वर्तमान परिस्थितीचे असल्याचे भासवून प्रसारित करणे हे वस्तुस्थितीशी विसंगत व दिशाभूल करणारे आहे.