चंद्रपूर:- शहर पोलीस ठाण्यात एका गुन्हेगाराने एका ४६ वर्षीय व्यक्तीने विषप्राशन केल्याचा आरोप असून, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. दिलीप यादव असे या व्यक्तीचे नाव असून, त्यांच्या मृत्यूने रयतवारी कॉलरी परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, मृत्यूपूर्वी दिलीप यादव यांनी रेकॉर्ड केलेला एक व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून, त्यात त्यांनी थेट काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत.
चंद्रपुरात घडलेल्या या घटनेमुळे पोलीस प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी भिवापूर परिसरात एक किलो गांजा जप्त करण्यात आला होता. या प्रकरणात दिलीप यादव यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न पोलीस करत असल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. मृत दिलीप यादव यांच्या नातेवाईकांच्या दाव्यानुसार, शहर पोलीस ठाण्यातच पोलिसांच्या जाचाला कंटाळून दिलीप यांनी विष प्राशन केले. पैशांची मागणी आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्यामुळेच दिलीप यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.
दुसरीकडे, पोलीस प्रशासनाने हे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावले आहेत. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप यादव यांनी पोलीस ठाण्यात पाऊल ठेवण्यापूर्वीच विषप्राशन केले होते. पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता, तिथे विषप्राशनाचा कोणताही प्रकार घडलेला नाही. उलट, दिलीप यादव यांना उलट्या सुरू होताच पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले, असे स्पष्टीकरण पोलिसांनी दिले आहे.
मृत्यूपूर्वीचा तो खळबळजनक व्हिडिओ, हताश झालेल्या कुटुंबीयांचे अश्रू आणि पोलिसांचा सीसीटीव्ही फुटेजचा दावा... यामुळे आता या प्रकरणाभोवतीचे गूढ अधिकच वाढले आहे. या प्रकरणात नेमके सत्य काय? दिलीप यादव यांना खरोखरच धमकावले जात होते की यामागे दुसरे काही कारण आहे? याचा तपास आता सुरू आहे.

