चौकशी न झाल्यास साखळी उपोषणाचा इशारा!
गोंडपिपरी:- गोंडपिपरी तालुक्यातील हिवरा ग्रामपंचायतीच्या मनमानी आणि संशयास्पद कारभाराविरोधात आता हिवरा गावचे ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत. ग्रामसभेत विचारलेल्या प्रश्नांना बगल देणे आणि माहिती अधिकाराची पायमल्ली करणे, आता ग्रामपंचायतीला चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे.
हिवरा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत जेव्हा जागरूक ग्रामस्थांनी १५ वा वित्त आयोग, सामान्य फंड आणि इतर विकासकामांच्या खर्चाबाबत जाब विचारला, तेव्हा त्यांना समाधानकारक उत्तरे देण्याऐवजी ग्रामसभा थेट मनमानी पद्धतीने तहकूब करण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
एवढेच नाही, तर माहिती अधिकार म्हणजेच RTI अंतर्गत मागवलेली माहिती कायदेशीर मुदतीत देण्यात आली नाही. प्रथम अपीलनंतर सक्षम अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही जनमाहिती अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. ऑनलाईन दिसणारा लाखो रुपयांचा खर्च आणि प्रत्यक्षात गावात झालेली कामे यात मोठी तफावत असून मोठा गैरव्यवहार झाल्याचा दाट संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते दिलीप पुलगमकर, प्रशासक सदस्य जितेंद्र गोहने, माजी उपसरपंच प्रकाशभाऊ हिवरकर, शंकरदादा येलमुले, भिवसन चहारे आणि रत्नज्योत कांबळे यांच्यासह ग्रामस्थांनी थेट गटविकास अधिकाऱ्यांचे (BDO) दार ठोठावले आहे. सविस्तर चौकशीची मागणी करणारे निवेदन देताना ग्रामस्थांचा संताप स्पष्टपणे पाहायला मिळत होता.
या गंभीर तक्रारीची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी येत्या २० दिवसांच्या आत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून त्याचा अहवाल देण्याचे आश्वासन तक्रारदारांना दिले आहे. मात्र, जर या निर्धारित २० दिवसांच्या मुदतीत निष्पक्ष चौकशी झाली नाही आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात आली नाही, तर संपूर्ण हिवरा गाव साखळी उपोषणासह तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडणार, असा स्पष्ट आणि आक्रमक इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष या २० दिवसांच्या चौकशीकडे लागले आहे.

