Accident News: चंद्रपुरातील मजुरांच्या तेलंगणात अपघात

Bhairav Diwase
अपघातात चार जणांचा मृत्यू, २७ जखमी
चंद्रपूर:-पोटाची खळगी भरण्यासाठी शेजारील तेलंगणा राज्यात गेलेल्या चंद्रपूरच्या मजुरांवर काळाने भीषण घाला घातला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातून तेलंगणात गेलेल्या मजुरांचा भीषण अपघात झाला असून, यामध्ये ४ मजुरांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, तर २७ मजूर गंभीर जखमी झाले आहेत.


सिंदेवाही तालुक्यातील पवना चक गावातील हे सर्व मजूर तेलंगणा राज्यात भात रोवणीच्या मजुरीसाठी गेले होते. काल सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास, शेतातील काम आटोपून आपल्या खोलीकडे परत जात असताना तेलंगणातील रामगुंडम येथे हा भीषण अपघात घडला.


या अपघातात मृत्यू झालेल्यांमध्ये तीन महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. मृतांची नावे अतुल वासुदेव सोनुले (वय ४५ वर्ष), अर्चना जनार्धन सोनुले (वय ४० वर्ष), प्रभा सिताराम मोहुर्ले (वय 56 वर्ष) आणि, रंजना प्रभाकर शेंडे (वय ५० वर्ष) अशी मृत महिलेचे नाव आहे .


चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणावर मजूर धान रोवणी आणि शेतमजुरीसाठी तेलंगणात जात असतात. मात्र, काम संपवून घरी परतत असतानाच या मजुरांच्या वाहनाला रामगुंडम येथे अपघात झाला. या अपघातात तब्बल २७ मजूर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.