ब्रम्हपुरी:- तालुक्यातील दक्षिण वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पद्मापूर नियतक्षेत्रात वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका ३० वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
रानभाजी तोडण्यासाठी जंगलाच्या जवळ गेलेल्या या तरुणावर दबा धरून बसलेल्या हिंस्त्र प्राण्याने अचानक प्राणघातक हल्ला केला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे.
मानव आणि वन्यजीव संघर्षाची ही भीषण घटना गुरुवारी, ९ जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास घडली. बल्लारपूर येथील रहिवासी असलेले ३० वर्षीय अनिल भास्कर दिवटे हे मौजा पद्मापूर चक जंगलाला लागून असलेल्या कुरण गट क्रमांक २१ मध्ये रानभाजी गोळा करण्यासाठी गेले होते. पावसाळ्याच्या दिवसांत उगवणारी रानभाजी तोडण्यात ते मग्न असतानाच, दबा धरून बसलेल्या वन्यप्राण्याने त्यांच्यावर अचानक झडप घातली.
हल्ला इतका भीषण आणि वेगवान होता की, वन्यप्राण्याने थेट अनिल यांच्या मानेवरच प्राणघातक वार केले. यात गंभीर जखमी झाल्यामुळे अनिल यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. वनविभाग आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. अनिल यांच्या मानेवर वन्यप्राण्याच्या दात आणि नखांच्या गंभीर जखमा आढळून आल्या असून, बाजूलाच त्यांनी गोळा केलेल्या रानभाजीची पिशवीही पडलेली पाहायला मिळाली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून ब्रम्हपुरी वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी ब्रम्हपुरी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, वनविभागाने परिसरात तातडीने शोधमोहीम आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. तसेच जंगलालगतच्या भागात नागरिकांना एकटे न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

