चंद्रपूर:- अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवणे एका लोकप्रतिनिधीला महागात पडले आहे का? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. गडचांदूर नगर परिषदेचे भाजप नगरसेवक सुरज पांडे यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप करत, आपल्यावर सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा पत्रकार परिषदेत केला आहे.
गडचांदूर नगर परिषदेचे नगरसेवक सुरज रामभवन पांडे यांनी आपल्या विरोधात दाखल गुन्ह्यांची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी थेट महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP), अपर पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) आणि चंद्रपूरच्या पोलीस अधीक्षकांकडे (SP) लेखी निवेदन सादर केले आहे.
पांडे यांचा आरोप आहे की, नगरसेवक म्हणून निवडून आल्यापासून त्यांनी शहरातील अवैध दारू विक्री, जुगार, मटका आणि जनावरांची अवैध तस्करी यांविरोधात सातत्याने आवाज उठवला. मात्र, गुन्हेगारांवर कारवाई करण्याऐवजी काही पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरच दबाव आणला आणि सूडबुद्धीने खोटे गुन्हे दाखल केले. निवेदनात ७ जुलै २०२६ रोजी पोलीस ठाण्यात घडलेल्या घडामोडींचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. त्या दिवशीचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज, स्टेशन डायरी, कॉल रेकॉर्ड्स आणि मोबाईल लोकेशन तातडीने जप्त करून त्यांची वरिष्ठ स्तरावरून तपासणी व्हावी, अशी मागणी पांडे यांनी केली आहे.
धक्कादायक बाब म्हणजे नगरसेवक सुरज पांडे यांच्यावर तडीपारीचा प्रस्ताव देखील तयार करण्यात आल्याचे समोर आले आहे. यावर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी, "माझ्या विरोधातील तडीपार प्रस्ताव आणि मी अवैध धंद्यांविरोधात केलेल्या तक्रारी, या दोन्ही बाबींची एकत्रित चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे," असे आव्हान दिले आहे. "तपासात जर मी दोषी आढळलो तर कोणतीही कारवाई भोगण्यास तयार आहे, पण जर गुन्हे खोटे कळाले, तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी," अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली आहे.
या प्रकरणाची चौकशी सध्याच्या ठाणेदारांकडे न ठेवता कोणत्याही वरिष्ठ निष्पक्ष अधिकाऱ्याकडे सोपवावी, अशी विनंतीही पांडे यांनी केली आहे. आता या गंभीर आरोपांनंतर चंद्रपूर पोलीस प्रशासन आणि राज्याचे गृहखाते काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

