चंद्रपूर:- महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेली सुगंधी तंबाखू बेकायदेशीरपणे बाळगणाऱ्या आणि तिची विक्री करणाऱ्या एका इसमाला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईत तब्बल ६७,७५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाणे हद्दीत बेकायदेशीर अंमली पदार्थ आणि प्रतिबंधित माल बाळगणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले होते. त्यानुसार, रामनगर पोलीस स्टेशनच्या शोध पथकाला एका गुप्त बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. रहेमतनगर येथील नुरी मस्जिद जवळील रहिवासी तोफिक करीम भिमानी (वय ३६ वर्षे) हा आपल्या घरात शासनाने बंदी घातलेली 'होला, ईगल, आणि क्रेझ' ही सुगंधी तंबाखू लपवून ठेवत असून त्याची विक्री करत आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या आधारे, पोलीस पथकाने ८ जुलै २०२६ रोजी रात्री सव्वा नऊ वाजताच्या सुमारास पंचांसह तोफिक भिमानी याच्या घरावर छापा टाकला. या छाप्यात पोलिसांनी ६७ हजार ७५० रुपये किमतीचा प्रतिबंधित तंबाखूचा साठा जप्त केला.
या प्रकरणी आरोपी तोफिक भिमानी याच्याविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ९०५/२०२६ नुसार, नवीन 'भारतीय न्याय संहिता' (BNS) च्या कलम १२३, २२३, २७५ आणि 'अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६' च्या कलम ३०(२)(a), २६(२)(i, iv), ५९ अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन राखुंडे करत आहेत.
ही यशस्वी पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काककडे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सहा. पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, सहा. पोलीस निरीक्षक हनुमान उगले, पोलीस उप निरीक्षक कृष्णा दराडे, पोलीस अंमलदार आनंद खरात, प्रकाश बलकी, रामप्रसाद नैताम, बाबा नैताम, रविकुमार डेंगळे, जितेंद्र आकरे, मनिषा मोरे, पंकज ठोंबरे, संदिप गेडाम, सुरेश कोरवार, प्रकाश मडावी, पंकज पोंदे व ब्ल्युटी साखरे यांनी केली आहे.

