चंद्रपूर:- चंद्रपूर-मूल महामार्गावरील आगडी गावाजवळच्या जंगलात काल सकाळी एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. जानाळा बिट कक्ष क्रमांक ७१४ मध्ये एका दुर्मिळ नर चांदी अस्वलाचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. या अत्यंत संवेदनशील वन्यजीव भ्रमणमार्गावर (Wildlife Corridor) आत्तापर्यंत तब्बल ४ चांदी अस्वलांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक नोंद झाली आहे.
हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य शशांक मोहरकर हे या महामार्गावरून जात असताना त्यांना हे अस्वल मृत अवस्थेत आढळून आले. त्यांनी तातडीने संस्थेचे अध्यक्ष दिनेश खाटे व नाजिश अली यांना माहिती दिली. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून चिचपल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी महेशकर मॅडम यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर चिचपल्ली वनक्षेत्राचे वनरक्षक अनिल नालमवाड, वनमजूर विकास निकोडे आणि शंभू मडावी यांनी घटनास्थळी धाव घेतली.
अतिसंवेदनशील कॉरिडोअर धोक्यात!
चंद्रपूर-मूल महामार्ग क्रमांक (NH-930) हा राष्ट्रीय महामार्ग उप-विभाग धानोरा (मुख्यालय - चंद्रपूर) यांच्या अखत्यारीत येतो. हा मार्ग कावल व्याघ्र प्रकल्प - कन्हाळगाव अभयारण्य - ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प - उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य यांना जोडणारा मुख्य वन्यजीव भ्रमणमार्ग आहे. ताडोबाचे बफर क्षेत्र आणि एफडीसीएमचे (FDCM) जंगल या महामार्गाला लागून असल्याने येथे वन्यजीवांची मोठी वर्दळ असते. यापूर्वी ऑक्टोबर २०२५ मध्ये याच मार्गावरील केसलाघाट परिसरात 'के मार्क' नामक वाघिणीच्या पिल्लाचाही अपघातात मृत्यू झाला होता.
वन्यजीव संस्थांचा संताप; प्रशासन सुस्त?
हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटी रस्ते अपघातात जीव गमावलेल्या वन्यजीवांची नोंद ठेवून उपाययोजना सुचवण्याचे काम करत आहे. संस्थेने राष्ट्रीय महामार्ग विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार केला. प्रशासनाने दिलेल्या उत्तरानुसार, आर्थिक वर्ष २०२४-२५ च्या नियोजनात 'फॉरेस्ट प्री-कन्स्ट्रक्शन ऍक्टिव्हिटी' अंतर्गत उपशमन योजनेचा (Mitigation Measures) प्रस्ताव मुख्य अभियंत्यांकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. मात्र, आता २०२६ चे अर्धे वर्ष संपत आले तरीही यावर प्रत्यक्ष कोणतीही कारवाई झालेली नाही. प्रशासनाच्या या दिरंगाईमुळे वन्यजीवांना आपला जीव गमवावा लागत असल्याने पर्यावरणप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

