चंद्रपूर:- गेल्या तीन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका बालिकेचा शोध घेण्यात चंद्रपूर पोलिसांच्या 'अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट' (AHTU) आणि स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) अत्यंत महत्त्वाचे यश आले आहे. गडचांदुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पळून गेलेल्या या बालिकेला पोलिसांनी हैदराबाद येथून शोधून काढले आहे.
पोलीस स्टेशन गडचांदुर येथे ३ वर्षांपूर्वी अप. क्र. 291/2024, कलम 137(2), 143 BNS अन्वये एका बालिकेच्या बेपत्ता होण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा दीर्घकाळापासून प्रलंबित होता आणि पोलीस सातत्याने तिचा शोध घेत होते. तपासादरम्यान, एएचटीयू (AHTU) आणि एलसीबी (LCB) चंद्रपूरच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली की, सदर बालिका तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथे एका ठिकाणी नोकरी करत आहे. माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ चक्रे फिरवली.
आज, ९ जुलै २०२६ रोजी पोलिसांनी अत्यंत हुशारीने या बालिकेशी संपर्क साधला. तिला विश्वासात घेऊन तिच्या मूळ गावी, म्हणजेच राहत्या घरी बोलावून घेतले. मुलगी घरी पोहोचताच पोलिसांनी तिला सुरक्षितपणे ताब्यात घेतले.
दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा छडा लागल्याने चंद्रपूर पोलिसांचे मोठे कौतुक होत आहे. पोलिसांनी बालिकेला ताब्यात घेतल्यानंतर पुढील कायदेशीर कारवाई आणि तपासासाठी गडचांदुर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
सदर कौतुकास्पद कामगिरी चंद्रपूरच्या AHTU (अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिट) आणि LCB (स्थानिक गुन्हे शाखा) पथकाने यशस्वीरित्या पार पाडली आहे.

