Chandrapur police: नाव बदललं, पत्ता बदलला... पण चंद्रपूर पोलिसांच्या नजरेतून नाही वाचू शकला!

Bhairav Diwase
२६ जणांना फसवणाऱ्या आरोपीला नागपुरातून बेड्या; चंद्रपूर पोलिसांची धडक कारवाई
चंद्रपूर:- म्हाडा (MHADA) मध्ये स्वस्त दरात सदनिका मिळवून देण्याचे आमिष दाखवून तब्बल २६ जणांना ९२ लाख ७७ हजार रुपयांचा गंडा घालणाऱ्या मुख्य आरोपीला चंद्रपूरच्या रामनगर पोलिसांनी अत्यंत नाट्यमयरीत्या अटक केली आहे. गेल्या ३ महिन्यांपासून पोलिसांना हुलकावणी देणारा हा आरोपी नागपूर, मुंबई, नाशिक अशा विविध शहरांमध्ये नाव बदलून लपून बसला होता. अखेर पोलिसांनी नागपुरात सापळा रचून त्याला बेड्या ठोकल्या आहेत.


चंद्रपूर शहरातील शुभम सुधाकर वांगलवार यांच्यासह २६ नागरिकांना म्हाडाची घरे देण्याचे आमिष दाखवून एकूण ९२ लाख ७७ हजार ७४० रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात २९ मार्च २०२६ रोजी भूपेंद्र चंद्रिकापुरे आणि त्याच्या इतर दोन साथीदारांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.


गुन्हा दाखल झाल्यापासून मुख्य आरोपी पोलिसांना सतत गुंगारा देत होता. तो अटक टाळण्यासाठी सतत आपले राहण्याचे ठिकाण बदलत होता. धक्कादायक बाब म्हणजे, त्याने स्वतःचे नाव बदलून नवीन नावाने वास्तव्य करण्यास सुरुवात केली होती. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास केला असता त्याचे खरे नाव भिमराव फुलचंद चंद्रिकापुरे (वय ४२ वर्षे, रा. वर्धा रोड, नागपूर उर्फ भूपेंद्र) असल्याचे निष्पन्न झाले.


आरोपीला पकडण्यासाठी चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांच्या मार्गदर्शनात रामनगर पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी प्रभावती एकुरके यांनी विशेष योजना आखली. सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान उगले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आरोपीचा नागपूर, मुंबई, वाशी, नवी मुंबई आणि नाशिक असा सलग पाठलाग केला. अखेर नागपूर येथे लावलेल्या सापळ्यात हा आरोपी अलगद अडकला.


सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून, फसवणूक केलेली रक्कम हस्तगत करण्याचे आणि त्याच्या इतर साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान, चंद्रपूर पोलिसांतर्फे नागरिकांना एक महत्त्वाचे आवाहन करण्यात आले आहे.


सदर आरोपी भिमराव उर्फ भूपेंद्र चंद्रिकापुरे याने जर चंद्रपूर शहरातील इतर कोणत्याही नागरिकाची अशा प्रकारे म्हाडा घरांच्या नावाखाली फसवणूक केली असेल, तर त्यांनी त्वरित रामनगर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.


ही कौतुकास्पद कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काककडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके, सपोनि हनुमान उगले, पोलीस अंमलदार रामप्रसाद नैताम, रविकुमार डेंगडे, राजू चिताडे आणि सुनिल गायके यांनी केली आहे.