B.Sc. Nursing College: चंद्रपुरात शासकीय B.Sc. Nursing महाविद्यालय होणार; वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Bhairav Diwase

चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात आता नवीन शासकीय बी.एस्सी. नर्सिंग महाविद्यालय सुरू होणार आहे. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री यांनी चालू विधिमंडळ अधिवेशनात यासंदर्भातील अधिकृत घोषणा केली आहे. राज्यातील गरीब आणि मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना कमी शुल्कात दर्जेदार वैद्यकीय शिक्षण मिळावे, यासाठी राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे.


राज्यातील आरोग्य यंत्रणे बळकट करण्यासाठी आणि कुशल परिचारिकांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारने नर्सिंग शिक्षणाच्या विस्ताराला मोठी गती दिली आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सरकारने तब्बल ४९१.९१ कोटी रुपयांच्या अनावर्ती आणि वार्षिक १२.५८ कोटी रुपयांच्या आवर्ती खर्चाला मंजुरी दिली आहे.


विशेष म्हणजे, या व्यापक योजनेत राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये चंद्रपूर जिल्ह्याचा प्राधान्याने समावेश करण्यात आला आहे. आतापर्यंत चंद्रपूर, गडचिरोली आणि परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना नर्सिंगच्या उच्च शिक्षणासाठी नागपूर किंवा इतर मोठ्या शहरांमध्ये जावे लागत होते. खासगी महाविद्यालयांचे भरमसाट शुल्क गरीब कुटुंबांच्या आवाक्याबाहेर होते. मात्र, आता चंद्रपुरातच शासकीय महाविद्यालय होणार असल्याने स्थानिक विद्यार्थ्यांचा मार्ग मोकळा झाला आहे.


या निर्णयामुळे चंद्रपूरसह संपूर्ण परिसरातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या आणि दर्जेदार शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.