Korpana News: भाजप नगरसेवकावर विनयभंग व धमकीचा गुन्हा; गडचांदूरमध्ये खळबळ

Bhairav Diwase

कोरपना:- जनतेचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ज्या लोकप्रतिनिधीवर असते, तोच लोकप्रतिनिधी आता एका महिलेच्या विनयभंग प्रकरणात अडकला आहे. गडचांदूर नगरपरिषदेचे भाजप नगरसेवक सूरज पांडे यांच्यावर एका महिलेचा विनयभंग करणे, घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देणे आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना ६ जुलैच्या रात्री घडली. पीडित महिला आपल्या मुलांसह घरी झोपलेली असताना, तिचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते. रात्रीच्या सुमारास अचानक घराचे दार जोरात ठोठावण्यात आले. महिलेने दार उघडताच समोर भाजप नगरसेवक सूरज पांडे उभे होते. "तुझ्या नवऱ्याने मला शिवीगाळ का केली?" असा जाब विचारत सूरज पांडे यांनी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, आरोपीने महिलेला अश्लील स्पर्श केला आणि तिला ढकलून जबरदस्तीने घरात प्रवेश केला.


"मी नगरसेवक आहे, तुला आणि तुझ्या पतीला जीवानिशी ठार मारीन, खोट्या गुन्ह्यात अडकवीन," अशी धमकीही यावेळी देण्यात आली. घाबरलेल्या महिलेने आरडाओरडा केल्यानंतर शेजारी धावून आले आणि शेजाऱ्यांना येताना पाहून आरोपी नगरसेवक घटनास्थळावरून पसार झाला.


या संपूर्ण धक्कादायक प्रकारानंतर पीडित महिलेने थेट गडचांदूर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तातडीने पावले उचलत भाजप नगरसेवक सूरज पांडे यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.