चंद्रपूर:- चंद्रपूर शहरातून एक अतिशय धक्कादायक आणि गंभीर बातमी समोर येत आहे. मुंधडा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या एका नऊ महिन्यांच्या गर्भवती मातेचा उपचारादरम्यान संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पार्वती राजेंद्र गुप्ता, वय ३० वर्षे, रा. अष्टभुजा वॉर्ड, चंद्रपूर असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनावर आणि डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा थेट आरोप केला आहे.
मृत पार्वती गुप्ता या गेल्या काही महिन्यांपासून डॉ. ऋतुजा मुंधडा यांच्याकडेच नियमित वैद्यकीय तपासणी आणि उपचार घेत होत्या. दोन दिवसांपूर्वीच त्यांना प्रसूतीसाठी मुंधडा रुग्णालयात भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान अचानक त्यांची प्रकृती चिंताजनक बनली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे दिसताच मुंधडा रुग्णालय प्रशासनाने त्यांना तातडीने शहरातील 'CHL' रुग्णालयात हलविले. मात्र, दुर्दैवाने तेथील डॉक्टरांनी तपासणीअंती पार्वती गुप्ता यांना मृत घोषित केले. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला असून डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळेच हा जीव गेल्याचा गंभीर आरोप केला आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-Mortem) करण्यात येत असून या संपूर्ण प्रकरणाची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी 'मेडिकल बोर्ड कमिटी' स्थापन करण्यात येईल. कमिटीचा चौकशी अहवाल आणि शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच मृत्यूचे नेमके आणि अचूक कारण स्पष्ट होऊ शकेल. अशी माहिती रामनगर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांनी दिली.
वैद्यकीय निष्काळजीपणामुळे हा मृत्यू झाला की अन्य काही तांत्रिक कारण होते, हे आता वैद्यकीय समितीच्या अहवालानंतरच समोर येईल. रामनगर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
