Agitation suspended for now: नागपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांचे १० दिवसांचे आंदोलन अखेर स्थगित!

Bhairav Diwase
नागपूर:- गेल्या १० दिवसांपासून नागपूर येथील आदिवासी विकास विभागाच्या अप्पर आयुक्त कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला अखेर यश आले आहे. 


आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी १० व्या दिवशी स्वतः आंदोलनस्थळी भेट देऊन विद्यार्थ्यांशी सकारात्मक आणि अत्यंत आदरपूर्वक चर्चा केली. या यशस्वी चर्चेनंतर विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन स्थगित करत असल्याची अधिकृत घोषणा केली आहे.


१३ ऑगस्टपासून विदर्भ तसेच संपूर्ण महाराष्ट्रात आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन छेडले होते. मंत्री अशोक वुईके यांनी विद्यार्थ्यांच्या १४ हून अधिक मुख्य मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेत त्या मान्य केल्या आहेत. यामध्ये ३० वर्षांवरील विद्यार्थ्यांना 'पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजने'चा लाभ देणे आणि वसतिगृह प्रवेशाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्याचा समावेश आहे.


आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले की, आदिवासी विद्यार्थी संघ, विदर्भ आणि नागपूरच्या वतीने महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू होते. हे सर्व आमचेच मुले आणि मुली आहेत. या उद्देशाने १८ तारखेपासून आम्ही त्यांच्याशी नियमित आणि सकारात्मक संवाद साधत होतो. विद्यार्थ्यांनी अत्यंत सन्मानजनक पद्धतीने चर्चा केली. या विभागाचा पालक आणि एक सेवक म्हणून मी त्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जे जे विद्यार्थी आंदोलन करत आहेत, त्यांना मी आवाहन करतो की आंदोलन स्थगित झाले असले, तरी मी तुमचा पालक आहे आणि हे विभाग तुमचेच आहे. यापुढेही तुमच्या शैक्षणिक प्रवासात ज्या काही अडचणी येतील, त्या सोडवण्यासाठी आम्ही नेहमी तत्पर राहू.


मंत्र्यांच्या या आश्वासनानंतर आणि सकारात्मक भूमिकेनंतर संपूर्ण विदर्भातील आदिवासी विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. प्रशासनाने मागण्या मान्य केल्यामुळे आता विद्यार्थ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले असून, विभागातील इतर विद्यार्थ्यांनाही आंदोलन संपवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.