LCB Chandrapur: बिहार ते चंद्रपूर अवैध शस्त्रांची तस्करी उधळली!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत बिहार ते चंद्रपूर चालणाऱ्या एका मोठ्या अवैध शस्त्रतस्करीचा डाव उधळून लावला आहे. पोलिसांनी या कारवाईत २ बनावट पिस्तुले, २ मॅगझिन, १३ जिवंत काडतुसे आणि एका कारसह ६ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून ३ आरोपींना अटक केली आहे.


चंद्रपूर जिल्ह्यात अवैध शस्त्रांची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या नेतृत्वाखाली विशेष मोहीम राबवली जात आहे. दरम्यान, २१ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गस्तीवर असताना, नागपूरकडून चंद्रपूरच्या दिशेने एका पांढऱ्या रंगाच्या टाटा झेस्ट (Tata Zest) कारमधून काही जण बेकायदेशीर अग्निशस्त्रे घेऊन येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली.


मिळालेल्या माहितीच्या आधारे, २२ ऑगस्ट रोजी पहाटे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल कचोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पडोली चौक परिसरात कडक नाकाबंदी लावली.


नाकाबंदी दरम्यान नागपूरकडून येणारी टाटा झेस्ट कार (क्रमांक MH-14-GD-0708) थांबवून पोलिसांनी चालकासह वाहनातील प्रवाशांची चौकशी केली. त्यांची संशयास्पद हालचाल पाहून पंचांसमक्ष घेतलेल्या झडतीमध्ये पोलिसांना २ बनावट लोखंडी पिस्तुले, २ मॅगझिन आणि १३ जिवंत काडतुसे आढळून आली.
या कारवाईत पोलिसांनी शस्त्रांसह ३ मोबाईल फोन आणि टाटा झेस्ट कार असा एकूण ६ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.


अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे :-
१. दुर्गेशकुमार सुधिर मिश्रा (वय २६, रा. गोपालपूर, जि. दरभंगा, बिहार)
२. रविकुमार राजकुमार पासवान (वय १९, रा. पिंडौन, जि. दरभंगा, बिहार)
३. सुनीलकुमार विजय सहानी (वय २०, रा. गोपालपूर, जि. दरभंगा, बिहार)

प्राथमिक चौकशीत ही शस्त्रे बिहार राज्यातून नागपूरपर्यंत आणली गेली आणि तेथून ऑनलाइन कॅब बुक करून चंद्रपूर येथे विक्रीसाठी आणली जात असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन पडोली येथे भारतीय हत्यार कायद्याच्या कलम ३ आणि २५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या आंतरराज्य तस्करीमागे आणखी कोणाचा हात आहे याचा पुढील तपास पोलीस करत आहेत. illegal शस्त्रांची खरेदी-विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा सज्जड इशारा चंद्रपूर पोलिसांनी दिला आहे.