चंद्रपूर:- शिक्षकांनी पालकांकडे तक्रार केल्यानंतर घरी आलेल्या एका १४ वर्षीय विद्यार्थिनीने स्वतःच्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (२२ ऑगस्ट) उघडकीस आली आहे. तनिष्का सुनील गाडगे (वय १४, रा. आनंदनगर प्लाझा अपार्टमेंट, चंद्रपूर) असे मृत मुलीचे नाव आहे.
तनिष्काचे आई-वडील दोघेही चंद्रपूर न्यायालयात वकील आहेत. तनिष्का कार्मेल अकॅडमीमध्ये नववीत शिक्षण घेत होती. शनिवारी तिने वर्गातील फळ्यावर काहीतरी मजकूर घेत शाळेच्या प्रभारी लिहिला होता. या प्रकाराची दखल मुख्याध्यापक व शिक्षकांनी तिच्या वडिलांना तातडीने शाळेत बोलावून मुलीबाबत तक्रार केली. तक्रारीनंतर तिचे वडील शाळेत गेले आणि तनिष्काला समजावून घरी घेऊन आले. तिला घरी सोडल्यानंतर ते कोर्टातील कामासाठी निघून गेले.
काही वेळानंतर तिची आई घरी आली असता, तनिष्का पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. माहिती मिळताच रामनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. सध्या रामनगर पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक प्रभावती एकुरके यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.
