पावसाळापूर्व तयारीचा उडाला फज्जा!
चंद्रपूर:- बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात वरुणराजाने जोरदार हजेरी लावली आहे. पहिल्याच पावसाने हवामानात गारवा आणला असला, तरी चंद्रपूर महानगरपालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचे पुरते 'पितळ' उघडे पाडले आहे. पहिल्याच दमदार पावसात चंद्रपूर शहर जलमय झाले असून, महापालिकेच्या दाव्यांचा पुरता फज्जा उडाला आहे.
चंद्रपूर शहरातील मुख्य रस्ते आणि चौकांना पहिल्याच पावसात तळ्याचे स्वरूप आले. शहरातील मुख्य मानला जाणारा श्री. टॉकीज चौक, एसबीआय बँक परिसर, पटेल शाळा, एलटीव्ही शाळा परिसर आणि तुकूम भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. पाण्याचा योग्य निचरा न झाल्याने रस्ते जलमय झाले आणि याचा थेट फटका वाहनधारकांना तसेच स्थानिक नागरिकांना बसला. अनेक ठिकाणी दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे नुकसान झाले, तर वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली. दरवर्षीप्रमाणे यंदाही मनपाने कोट्यवधी रुपये खर्च करून नेमकी कोणती पावसाळापूर्व कामे केली? असा संतप्त सवाल आता चंद्रपूरकर विचारत आहेत.
दुसरीकडे, शहरात जरी प्रशासनाची पोलखोल झाली असली, तरी ग्रामीण भागातून मात्र सुखद चित्र समोर आले आहे. या पावसामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चातकासारखी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. उकाड्याने हैराण झालेल्या धरणीमातेला शेवटी विसावा मिळाला असून, ग्रामीण भागात पेरणीच्या कामांना आता वेग येणार आहे. त्यामुळे हा पाऊस चंद्रपूर शहरासाठी डोकेदुखी ठरला असला, तरी ग्रामीण भागातील बळीराजासाठी मात्र वरदान ठरला आहे.

