Korpana News: कत्तलीसाठी जाणारी १२ गोवंश जनावरांची सुटका

Bhairav Diwase

कोरपना:- गडचांदूर पोलीस हद्दीतून एका पिकअप वाहनातून कत्तलीच्या उद्देशाने अत्यंत निर्दयतेने नेली जाणारी १२ गोवंश जनावरे (गाई) सोडवण्यात गडचांदूर पोलिसांना मोठे यश आले आहे. या कारवाईत पोलिसांनी वाहनासह एकूण ७ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, एका आरोपीला ताब्यात घेतले आहे, तर त्याचा चालक साथीदार फरार झाला आहे.

मुखाबिराच्या माहितीवरून नाकाबंदी:

मिळालेल्या माहितीनुसार, २२ जून २०२६ रोजी गडचांदूर पोलिसांना गुप्त बातमीदाराकडून (मुखाबीर) माहिती मिळाली की, एका पिकअप वाहनातून गोवंश जनावरांची कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने हालचाली करत मौजा आसन बस स्टॉपजवळ नाकाबंदी केली.


कोंबाकोंबी करून चालली होती वाहतूक:

नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी संशयित बोलेरो पिकअप वाहन (क्र. MH ३२-AJ-६४७१) थांबवले. पंचांसमक्ष वाहनाची तपासणी केली असता, त्यात चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता अत्यंत निर्दयतेने कोंबाकोंबी करून १२ जिवंत गाई भरलेल्या आढळल्या. वाहनातील इसमाकडे पशुवैद्यकीय प्रमाणपत्र किंवा जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या पावत्या मागितल्या असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, ही जनावरे कत्तलीसाठी बाहेरगावी नेली जात असल्याची कबुली त्याने दिली.


लाखोंचा मुद्देमाल जप्त:

या धडक कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

१२ जिवंत गाई: अंदाजे किंमत २,४०,०००/- रुपये

महिंद्रा मॅक्स बोलेरो पिकअप (MH-३२-AJ-६४७१):‌ अंदाजे किंमत ५,००,०००/- रुपये

एकूण जप्त माल: ७,४०,०००/- रुपये


एक आरोपी ताब्यात, चालक फरार:

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी संतोष रामाजी परचाके (वय ३५ वर्षे, रा. कळंब हळदी पुरा, ता. जि. यवतमाळ) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध गडचांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा साथीदार (पिकअप चालक) घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीस पथकाची कामगिरी

सदर यशस्वी कारवाई चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गडचांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात सपोनी सुखदेव गोदे, पोलीस अंमलदार बलवंत शर्मा, सुरज, प्रकाश आणि साईनाथ यांनी केली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास गडचांदूर पोलीस करत आहेत.