१० तासांच्या आंदोलनाला मोठे यश
गोंडपिपरी:- वढोली येथे सुरू करण्यात आलेल्या दारू दुकानाविरोधात ग्रामस्थांनी केलेल्या तब्बल १० तासांच्या रस्ता रोको आंदोलनाला अखेर मोठे यश मिळाले. शुक्रवारी सायंकाळी ४ वाजता सुरू झालेले आंदोलन शनिवारी पहाटे २ वाजेपर्यंत सुरू होते.आंदोलनामुळे गोंडपिपरी–मूल मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.
सुमारे ५०० महिला,पुरुष व बालकांनी आंदोलनात सहभाग घेतल्याने प्रशासनालाही तातडीने दखल घ्यावी लागली.
रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या चर्चेनंतर उपविभागीय दंडाधिकारी अर्जुन पावरा यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांनी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ मधील कलम १४२(२) अंतर्गत वढोली येथील एस. के. बार अँड रेस्टॉरंट २० जून ते ३० जून २०२६ या कालावधीत बंद ठेवण्याचे आदेश जारी केले.
गेल्या सुमारे ३० वर्षांपासून दारूबंदी असलेल्या वढोली गावात ग्रामसभेचा ठराव आणि ग्रामस्थांच्या तीव्र विरोधानंतरही दारू दुकान सुरू करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली होती. अखेर ग्रामस्थांच्या एकजुटीसमोर प्रशासनाला निर्णय घ्यावा लागला.
मात्र,ग्रामस्थांनी हा केवळ पहिला टप्पा असल्याचे स्पष्ट केले असून ३० जूननंतरही दारू दुकान कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी कायम राहणार आहे. ग्रामसभेच्या ठरावाचा सन्मान करून गावातील दारूबंदी कायम ठेवावी,अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला.

