पोंभुर्णा:- पोंभूर्णा तालुक्यातील वेळवा (माल) ग्रामपंचायतीच्या कारभारावर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आर्थिक वर्ष २०२४ ते थेट २०२६-२७ च्या चालू कालावधीपर्यंत ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांचा मोठा आर्थिक गैरव्यवहार आणि प्रशासकीय अनियमितता झाल्याचा खळबळजनक आरोप थेट स्थानिक ग्रामस्थांनी केला आहे.
शासकीय संकेतस्थळ 'मेरी ग्रामपंचायत' आणि 'इ-ग्राम स्वराज' च्या आधारे ग्रामस्थांनी हा भ्रष्टाचाराचा पाढा वाचला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, प्रशासकाला अधिकार नसतानाही त्यांनी तब्बल १० लाख ८६ हजार रुपयांचे बेकायदेशीर आर्थिक व्यवहार केल्याचा थेट आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एवढेच नव्हे तर कोरोना काळातील रोजंदारीवर नसलेल्या बनावट कामगाराच्या नावावर चक्क मार्च २०२६ मध्ये ४१,५०० रुपयांचे देयक अदा करण्यात आले.
विनाअधिकार प्रशासकाकडून १०.८६ लाखांचे व्यवहार, कोरोना काळातील बनावट कर्मचाऱ्याला चुकीची देयके मंजूर, शाळा व अंगणवाडी साहित्यामध्ये कागदोपत्री खरेदी, मोजमाप पुस्तिका (Muster Roll) आणि बिलांमध्ये प्रचंड तफावत आढळली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी सरपंच, सदस्य आणि संबंधित कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विशेष म्हणजे, जर येत्या १० दिवसांच्या आत या गंभीर प्रकरणावर चौकशी आणि कारवाई झाली नाही, तर हा संपूर्ण घोटाळा थेट उच्च न्यायालयासमोर (High Court) मांडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

