Murder News: जागेच्या वादातून मोठ्या भावाचा कुऱ्हाडीने हल्ला

Bhairav Diwase
धाकट्या भावाचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी
सावली:- सावली तालुक्यातील पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव (मस्के) येथे एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना उघडकीस आली आहे. केवळ घराच्या जागेच्या वादातून सख्ख्या मोठ्या भावाने आपल्या धाकट्या भावावर आणि त्याच्या पत्नीवर कुऱ्हाडीने प्राणघातक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात धाकट्या भावाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, त्याची पत्नी नागपूर येथे मृत्यूशी झुंज देत आहे.


भरदिवसा घडले थरारनाट्य

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार, १७ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजताच्या सुमारास कुकसू बावणे आणि त्यांची पत्नी योगिता बावणे हे आपल्या घरात काम करत होते. याच वेळी घराच्या जागेच्या जुन्या वादावरून मोठा भाऊ आरोपी शामराव बावणे याच्यासोबत त्यांचा वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की शामरावने घरातून कुऱ्हाड आणून दोघांवरही सपासप वार केले.


उपचारादरम्यान धाकट्याचा मृत्यू, पत्नीची प्रकृती चिंताजनक

हल्ल्यानंतर कुकसू आणि योगिता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यांना तातडीने गडचिरोली येथील सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, दोघांचीही प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नागपूरला रेफर करण्यात आले. दुर्दैवाने, नागपूर येथे उपचार सुरू असतानाच कुकसू बावणे यांची प्राणज्योत मालवली. तर योगिता बावणे यांच्यावर अद्याप उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.


या घटनेमुळे डोंगरगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून सख्ख्या भावानेच रक्ताचे नाते कलंकित केल्यामुळे नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी आरोपी शामराव बावणे यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली पाथरीचे ठाणेदार नितेश डोर्लीकर आणि पोलीस उपनिरीक्षक गोविंद चाटे पुढील तपास करत आहेत.