Chandrapur News: चंद्रपूर हादरलं! नवजात बालक विक्रीप्रकरणी भाजपाच्या दोन महिला पदाधिकाऱ्यांना अटक!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- पैशांच्या हव्यासापोटी एका कसाई मातेने आपल्याच अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाचा सौदा केल्याची घटना ताजी असतानाच, आता या प्रकरणाला एक मोठे राजकीय वळण मिळाले आहे. या बालक विक्री प्रकरणात चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटातील दोन प्रमुख महिला कार्यकर्त्यांना रामनगर पोलिसांनी अटक केली आहे.


चंद्रपूर शहर या घटनेने पुरते हादरून गेले आहे. रामनगर पोलिसांनी अत्यंत कौशल्यपूर्ण तपास करत तब्बल महिनाभरानंतर या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. भाजपा आमदार किशोर जोरगेवार यांच्या गटातील कट्टर कार्यकर्त्या सायली येरणे आणि भाग्यश्री हांडे या दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांना या प्रकरणात थेट सहभाग असल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने या दोन्ही महिलांची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत (जेलमध्ये) केली आहे.


या प्रकरणात आधीच अनेक धक्कादायक खुलासे झाले होते. पीडित अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा तिचा प्रियकर अजय फुलझेले, पोटच्या गोळ्याचा सौदा करणारी ती निर्दयी माता, आणि बेकायदेशीरपणे बाळ खरेदी करणाऱ्या दोन महिला आधीच पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण आता या संपूर्ण खरेदी-विक्रीच्या व्यवहारात या दोन राजकीय महिला पदाधिकाऱ्यांचे नाव समोर आल्याने चंद्रपूरच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.


पैशांच्या मोहापायी नवजात जिवाचा बाजार मांडणाऱ्या या टोळीमध्ये आणखी कोणाकोणाचा समावेश आहे? आणि या मागे काही मोठे रॅकेट कार्यरत आहे का? याचा तपास आता रामनगर पोलिस करत आहेत.
Tags